मुंबई : मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आलेले पत्र बनावट असल्याचा, दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत होता. याप्रकरणी आता महिला पोलिसांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात बदनामी करणे, बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याप्रकरणाची चौकशी सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करीत आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आल्याचे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. प्रसारित झालेल्या पत्रावर आठ महिला पोलिसांनी स्वाक्षऱ्या केल्याचे दिसत होते. संबंधित महिला पोलिसांची चौकशी केली असता या पत्रातील स्वाक्षरी आपली नसल्याचे त्यांनी सांगितले. काही समाजकंटकांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी हे पत्र प्रसारित केल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले होते. आता याप्रकरणी ज्या महिला पोलिसाच्या नावाने पत्र लिहिण्यात आले होते, तिच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनामी करणे, अब्रुनकसानी करणे, बनावट कागदपत्र तयार करणे यासाठी भादंवि कलम ४६५, ४६८, ४६९, ४७१, ५००, ५०९ भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार महिला पोलीस व इतर सहकाऱ्यांच्या नावाचा व स्वाक्षरीचा वापर करून पत्र तयार करण्यात आले असून त्यांची बदनामी करण्याच्या हेतून ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. त्यामुळे पोलीस खात्याचीही प्रतिमा मलीन करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पत्रातील उल्लेख असलेली कोणतीही घटना घडली नसून ते खोटे पत्र पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशी कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी याप्रकरणी सहपोलीस आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्याअंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून पत्रातील सर्व महिला पोलिसांचा जबाब नोंदवण्यात आला होता.