मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट ७ कडे सोपवण्यात आला आहे. या गुह्यात क्राईम ब्रँचने अटक केलेल्या भावेश भिंडेला न्यायालयात हजर केले होते. त्याला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर भिंडेने होर्डिंगसाठी कशा प्रकारे परवानग्या मिळवल्या होत्या याचा तपास युनिट ७ करणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे घाटकोपर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडून १६ जणांचा मृत्यू झाला होता. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भावेश भिंडे आणि इतर जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुह्याच्या तपासासाठी ७ पथके तयार केली होती. पोलीस मागावर असल्याचे समजताच भिंडे हा लोणावळा येथे पळून गेला होता. त्यानंतर तो अहमदाबाद येथून उदयपूर येथे गेला. तेथे तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याची माहिती समजताच पोलीसांनी उदयपूर येथून भिंडेला अटक केली. आज सकाळी पोलिसांचे पथक भिंडेला घेऊन मुंबईत आले.
या गुह्याचा तपास पंतनगर पोलिसांकडून क्राईम ब्रँच युनिट ७ कडे सोपवण्यात आला. आज भिंडेला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. भिंडेचे किती ठिकाणी होर्डिंग लागले आहेत, जेथे दुर्घटना घडली, त्याचे स्ट्रक्चर ऑडिट कधी झाले होते याचा तपास केला जाणार आहे. तसेच होर्डिंगसाठी कधी, कोणाकडून आणि कशा प्रकारे परवानग्या घेतला होत्या, पंपनीत काही संचालकांची भूमिका काय होती, याचा तपास केला जाईल.