मुंबई : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत शनिवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून पुढील दोन – तीन तास मुंबईसह रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे मुंबई तसेच उपनगरांतील काही भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. दादर, वरळी, वांद्रे, घाटकोपर, अंधेरी, पवई, कुर्ला आणि चेंबूर आदी परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ,मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे . या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी पाणी साचणाऱ्या सखलभागावर लक्ष ठेऊन आहेत.
राज्याच्या मध्य भागात परस्परविरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. नवी मुंबई, खालघर, कामोठे, पनवेल आदी भागातही शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील एक – दोन तास पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.