मुंबई/ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो प्रवासी ज्या मेट्रो 4 आणि मेट्रो 4A प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिकांसाठी आवश्यक असलेले रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) चे प्रमाणपत्र नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पांच्या अंतिम तपासणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मेट्रो 4 ही वडाळा ते कासारवडवली दरम्यान धावणारी ३२.३२ किलोमीटर लांबीची मार्गिका असून, मेट्रो 4A ही २.७ किलोमीटरची विस्तार मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून एकूण ३२ स्थानके उभारण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाणे यांच्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, येत्या तीन महिन्यांत मेट्रो 4 चा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन या सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश असेल. संबंधित स्थानकांवरील बहुतांश बांधकामे तसेच आवश्यक तांत्रिक कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात पोहोचली आहेत. मेट्रो 4 आणि 4A सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई-ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. त्याचबरोबर या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासही मोठी मदत होणार असून, दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गायमुख ते कॅडबरी जंक्शन दरम्यानच्या स्थानकांची नावे:
१. गायमुख (Gaimukh)
२. गव्हाणपाडा / गोवनीवाडा Gowniwada / Gavanpada)
३. कासरवडवली (Kasarvadavali)
४. विजय गार्डन (Vijay Garden)
५. डोंगरी पाडा (Dongari Pada)
६. टिकुजी-नी-वाडी (Tikuji-Ni-Wadi)
७. मानपाडा (Manpada)
८. कापूरबावड़ी (Kapurbawdi)
९. माझीवाडा (Majiwada)
१०. कॅडबरी जंक्शन (Cadbury Junction)

