मुंबई : पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना टँकरचे पाणी मिळवण्यासाठी आता फोनवर अवलंबून राहावे लागणार नाही. मुंबई महानगरपालिका लवकरच नागरिकांसाठी स्वतंत्र टँकर ॲप्लिकेशन विकसित करणार असून, या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या तातडीने टँकर मागवणे शक्य होणार आहे. सध्या पाणीटंचाई किंवा पाणी कपातीच्या काळात नागरिकांना महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाशी किंवा खासगी टँकर चालकांशी फोनद्वारे संपर्क साधावा लागतो. मात्र, अनेकदा फोन न लागणे किंवा वेळेत प्रतिसाद न मिळाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने टँकर सेवा अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी ॲप्लिकेशन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहराला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी अनेक भागांमध्ये आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विशेषतः पाणी कपातीच्या काळात टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. नवीन ॲप्लिकेशनवर नागरिकांनी टँकरची मागणी नोंदवल्यानंतर त्यांच्या जवळच्या टँकर भरणा केंद्रातून टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची सध्या ३१ टँकर भरणा केंद्रे असून, या केंद्रांमधून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. टँकर भरण्याचा वेग वाढवण्यासाठी आता ८० मिमी व्यासाची अल्ट्रासॉनिक जलमापक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सध्या एका टँकरमध्ये १० हजार लिटर पाणी भरण्यासाठी साधारण दहा मिनिटांचा कालावधी लागतो. नवीन यंत्रणा बसवल्यानंतर एका तासात ६३ ते ७८ हजार लिटरपर्यंत पाणी भरणे शक्य होणार आहे. सध्या एका तासात ४० ते ५० हजार लिटर पाणी भरणा केले जाते. त्यामुळे टँकर भरण्याची प्रक्रिया वेगवान होऊन नागरिकांना अधिक जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. ॲप्लिकेशनवर टँकरची मागणी केल्यानंतर जीपीआरएस प्रणालीच्या माध्यमातून टँकर संबंधित ठिकाणी पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्रपणे पत्ता सांगण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच या ॲपवर दिवसभरातील पाणीपुरवठ्याची माहिती, कोणत्या टँकर भरणा केंद्रावरून किती पाणीपुरवठा झाला याचा तपशीलही उपलब्ध होणार आहे. या ॲप्लिकेशनच्या निर्मितीसाठी तज्ज्ञांची नियुक्ती करून लवकरच अभ्यास करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, याचा आढावा घेतल्यानंतर ॲप विकसित केले जाणार आहे. हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करता येणार असून, नागरिकांना फोन न करता थेट मोबाईलवरून टँकरची मागणी करता येणार आहे. सध्या मुंबईत पाणी कपात सुरू असल्यामुळे महापालिकेच्या ३१ टँकर भरणा केंद्रांमधून दररोज सरासरी २५० ते ३०० टँकरची मागणी केली जाते. याशिवाय खासगी टँकरच्या माध्यमातून बांधकाम आणि इतर ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, खासगी टँकरच्या तुलनेत महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जाणारे पाणी अधिक शुद्ध असल्यामुळे त्याला नागरिकांकडून अधिक मागणी असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
