ठाणे : कर्करोग संदर्भातील माहिती कर्क रुग्णांना एका ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासह, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मनात विश्वास, उमेद निर्माण होण्यासाठी ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. ठाण्यातील तीनहात नाका येथे हे केंद्र सुरु असून शहरातील आधाररेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून याठिकाणी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. ठाणे शहरातील आधाररेखा प्रतिष्ठान गेले ११ वर्षे कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे. ठाण्यात राहणाऱ्या रश्मी जोशी याचे पती अरविंद जोशी हे कर्करोगग्रस्त होते. त्यामुळे कर्करुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचणी, वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. हा त्रास इतर रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना होऊ नये यासाठी या पती-पत्नीने मे २०१३ मध्ये ‘आधाररेखा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध योजना आखून विनामूल्य सहकार्य करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार, संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला आरोग्याविषयीची माहिती देण्यासाठी मोफत आरोग्यजत्रा उपक्रम, वैद्यकीय, आहारशास्त्र, मानसशास्त्र आणि योगाभ्यास या विषयावर तज्ज्ञ वक्त्यांची ‘आधार माला’ या नावाने संवाद मालिका राबविण्यात आली. हे समाजकार्य करत असताना २०१७ मध्ये अरविंद जोशी याचे निधन झाले, परंतु, अरविंद यांच्या पत्नी रश्मी यांनी हे समाजकार्य पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवले.