पुणे प्रतिनिधी : गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिस यंत्रणा व्यस्त असताना एकाने माथाडीच्या वादातून वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि. 17) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. अक्षय उर्फ बाळा लहू शिंदे (30, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) व रंजीत नथुराम सलगर (वय 24, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित अमृत राठोड (19, रा. रशिदवाडी, पुनावळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. फिनिक्स मॉलमध्ये शिंदे पूर्वी माथाडीचे काम करीत होता. त्या वेळी त्याने तेथे काही मुलांची नोंद करून त्यांना कामाला लावले होते. मुलांना माथाडीमध्ये काम मिळावे, असे त्याचे म्हणणे होते; मात्र काम मिळत नसल्याचा त्याला राग होता. मॉलच्या पाठीमागील प्रवेशद्वाराजवळ शिंदे आला. फिर्यादी अभिजित यांना उद्देशून तुम्ही येथे काम कसे करता, मी तुमच्याकडे बघून घेतो. मी इथला भाई आहे, आज जर बुवा सापडला असता तर त्याला गोळ्या घातल्या असत्या, असे बोलून कमरेला लावलेले रिव्हॉल्वर काढले आणि अभिजित व त्यांच्या सहकार्याच्या दिशेने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गोळीबार केल्यानंतर आरोपी शिंदे तात्काळ पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेर्यात ही घटना कैद झाली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीसांना एक रिकामी पुंगळी सापडली. वाकड पोलीसांनी तपास करीत बुधवारी सायंकाळी शिंदे याला ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार कारचालक रंजीत सलगर याला गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.