मुंबई : सध्या सर्वत्र आयपीएलचा जोश आहे. क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएलचा सीझन खास असतो, अनेकांना या मॅचेस पाहण्यात रस असतो. मात्र याचाच गैरफायदा घेऊन काहीजण स्वत:च्या तुंबड्या भरून घेतात. अशीच एक धक्कादायक केस मुंबईत उघड झाली. बनावट वेबसाइटद्वारे आयपीएलच्या तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दक्षिण विभागीय सायबर पोलिस अधिकऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गुजरातमधून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील भामट्यांनी बनावट वेबपेज लिंकद्वारे किती प्रमाणात तिकिटे विकली याचा अधिकारी सध्या तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) अनिल माखिजा (६६) यांनी तक्रार दाखल केली होती. एक अज्ञात व्यक्ती https://bookmyshow.cloud/sports/tata-ipl-2024 या नावाची बनावट वेब पेज लिंक तयार करून आयपीएल तिकिटे विकत आहे, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. माखिजा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले की, आरोपींनी https://bookmyshow.cloud/sports/tata-ipl-2024 बनावट वेब पेजची लिंक तयार केली आणि या फेक वेबसाईटवरून आयपीएल तिकिटांची विक्री केली जात आहे, असेही त्यात म्हटले होते.
दक्षिण क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल होताच, सायबर पोलीस आणि क्राइम इंटेलिजन्स युनिटने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की हे बनावट पोर्टल सौदी अरेबियातील एका आरोपीने डिझाइन केले होते आणि सर्व्हर हाँगकाँगमध्ये होता. त्यानंतर पोलिसांनी पेमेंट गेटवेचा तपास सुरू केला आणि त्यांना असे आढळून आले की, सुरतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामरेज शाखेतील एका खात्यात पेमेंट जमा करण्यात आले. तसेच बनावट वेबपेजची लिंक सुरतमधून ऑपरेट केली जात असल्याचेही युनिटला आढळले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी पथकाने सुरत येथे जाऊन आरोपी खुशाल रमेशभाई डोगरिया (वय २४) याला अटक केली. तसेच पोलिसांनी आणखी सहा आरोपींना अटक केली. भार्गव बोराड (२२), उत्तम भिमाणी (२१), जस्मिन पिठाणी (२२), हिम्मत अंतला (३५), निकुंज खिमानी (२७) आणि अरविंदभाई चोटालिया (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खुशाल डोगरिया हा या टोळीचा प्रमुख असल्याचे समोर आले आहे. तर इतर आरोपींनी त्यामध्ये अनेक कामं केली. बोराड याने खुशाल याला बँक खाते उघडण्यासाठी आणि त्या खात्याशी जोडण्यासाठी मोबाईल क्रमांक प्रोव्हाईड केला. तर उत्तम मनसुखभाई भिमानी यांनी वेबसाइट डेव्हलप केली. जास्मिन गिरधरभाई पिठाणी याने या प्रकरणातील मुख्य आरोपी खुशाल याकडून बँकेचे तपशील आणि मोबाईल क्रमांक घेतला आणि इतर आरोपींना तो दिला. सहआरोपी निकुंज भूपतभाई खिमानी आणि अरविंदभाई अमृतलाल चोटालिया यांच्यासह हिम्मत रमेशभाई अंतला यांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम एटीएममधून काढली होती. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.