ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुध्दिमत्ता महत्त्वाची आहे. सर्व परीक्षार्थींनी या परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जावे आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन मुंबई लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी नुकतेच डॉ. रवींद्र शिसवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी डॉ. शिसवे यांचे स्वागत केले.
सन २००१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले डॉ. रवींद्र शिसवे यांनी यावेळी ठाणे आणि मुंबईतून स्पर्धा परीक्षांना बसलेल्या परीक्षार्थींशी संवाद साधला. अभ्यासाबाबत संवेदनशीलता, सकारात्मकता महत्त्वाची आहे. त्याचवेळी, समाजातील नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, अभ्यासाचे योग्य पध्दतीने नियोजन करणे, त्यासाठी वेळेची आखणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. केलेल्या अभ्यासाची पेन्सिल उजळणी करणे, विचार करण्याची पद्धत कशी विकसित करायची, महत्त्वाचे मुद्दे कसे काढायचे याच्याबद्दलही डॉ. शिसवे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, अभ्यासाच्या नोट्स काढताना शॉर्ट हॅण्ड कौशल्याचा वापर करण्याचीही सूचना त्यांनी केली.
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असेही डॉ. शिसवे म्हणाले. विविध उदाहरणे देत डॉ. शिसवे यांनी हा संवाद साधला. परीक्षार्थींच्या प्रश्नोत्तरांनी या सत्राची सांगता झाली. संस्थेचे गिरीश झेंडे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.