ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाबाहेरील परिसरात रस्ते, वाहनांसाठी पूल, विद्युत व्यवस्था आणि प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उभारणीची कामे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मुख्य स्थानक उभारणीची कामे लवकरच सुरू होण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्यामुळे गेले अनेक वर्षे कागदावर असलेले या स्थानकाच्या उभारणीला वेग येणार आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले नागरीकरण पहाता नव्या स्थानकाचा प्रश्न मार्गी लागणे अतिशय गरजेचे आहे. घोडबंदर, विस्तारणारे वागळे इस्टेट, वर्तकनगर यासारखा परिसर तसेच जुन्या स्थानकाच्या दोन्ही बाजूंना उभ्या रहाणाऱ्या नव्या वस्त्यांसाठी मेट्रो, उड्डाणपूल, उन्नत मार्गांची उभारणी ही जशी काळाची गरज आहे त्याचप्रमाणे नवे स्थानक लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक मानले जात आहे. ठाणे आणि मुलुंड शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. या दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा भार वाढला आहे. प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. यामुळेच दोन्ही स्थानकांवरील प्रवासी भार कमी करण्यासाठी नवीन स्थानकाचा प्रस्ताव काही वर्षांपुर्वी पुढे आला. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा अभ्यास करून ठाणे महापालिकेने २००८मध्ये सविस्तर अभ्यास करून नवीन स्थानक प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि अधिकारी, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या सर्वांच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पालिकेने नवे स्थानक उभारण्यासाठीचा आराखडा तयार केला. त्यास रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. त्यामुळे या स्थानकाच्या प्रस्तावास वेग आला खरा, परंतु मनोरुग्णालयाच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या या स्थानकाला आरोग्य विभागाची परवानगी मिळत नव्हती. तसेच या संदर्भात एक जनहित याचिका दाखल झाली होती.
मनोरुग्णालयाची जागा आरोग्य विभागाने रेल्वेकडे हस्तांतरित केल्यानंतर स्थानक उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती. मात्र एका जनहित याचिकेवर सुनावणी घेताना मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करून ‘थर्ड पार्टी इंटरेस्ट’ निर्माण करू नका असे आदेश १२ ऑगस्ट, २०१५ रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरित होत नव्हती. परिणामी तांत्रिक आणि वित्तीय मंजुरी असतानाही रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू होत नव्हते. हा न्यायालयीन तिढा दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आणि ठाणे महापालिकेला दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात नुकतेच एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यात व्यापक जनहितासाठी नवे ठाणे स्थानक उभारणीची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. व्यापक जनहिताचा विचार करता जागा हस्तांतरणाबाबतचे स्थगिती आदेश न्यायालयाने उठवावेत अशी विनंती त्या प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठविले होते. यामुळे नवीन स्थानक उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे.
ठाणे मनोरुग्णालयाच्या ७२ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. या स्थानकाच्या आराखड्यास रेल्वे विभागाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. रेल्वे हद्दीतील कामे रेल्वे विभागामार्फत तर रेल्वे हद्दीबाहेरील कामे महापालिका करणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे काम स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचे नियोजन होते. रेल्वे हद्दीतील कामांसाठी पालिका रेल्वे विभागाला १८४ कोटी रुपये देणार होती. शिवाय, भविष्यात प्रकल्प खर्चा होणारी भाववाढ आणि इतर कारणांमुळे होणारा खर्चही देणार होती. परंतु हा खर्च रेल्वे विभागाने करावा, अशी मागणी खासदार डॅा. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत केली होती. त्यावर, नवीन ठाणे रेल्वे स्थानक परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करेल तर परिचलन क्षेत्राबाहेरील काम ठाणे स्मार्ट सिटी करेल, असा निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच घेतला. या निर्णयामुळे रेल्वे स्थानक उभारणी कामाला गती मिळणार असून त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे अंदाजे १८४ कोटी रुपये वाचणार आहेत. नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशी कामे पालिकेने काही वर्षांपुर्वीच सुरू केली आहेत. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच याठिकाणी डेक उभारण्यात येत आहे. रेल्वे स्थानक उभारणीचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. परंतु कामे लवकरच सुरू होण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्यामुळे गेले अनेक वर्षे कागदावर असलेले नवीन स्थानकाची उभारणी होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच लाख प्रवासी प्रवास करतात. त्याचप्रमाणे मुलुंड रेल्वे स्थानकातूनही हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. या स्थानकांवर प्रवाशांचा भार वाढला आहे. तो कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील ३५ टक्के तर, मुलुंड रेल्वे स्थानकातील २५ टक्के गर्दी कमी होणार आहे. नव्या स्थानकामुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक विभागली जाणार आहे. यामुळे स्थानक भागातील कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. नवीन स्थानकाचा फायदा घोडबंदर, वागळे इस्टेट, पोखरण रोड परिसरातील प्रवाशांना होणार आहे. येथील प्रवाशांसाठी नवीन स्थानक परिसरात अंतर्गत मेट्रोचे स्थानकही प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत.