उल्हासनगर : पिण्याचे पाणी येण्याच्या वेळेचा रात्रीचा खेळ चालणाऱ्या उल्हासनगरातील शापित भागात पिण्याच्या पाण्यात चक्क नालीचे पाणी येऊ लागले आहे.हे गढूळ।पाणी बॉटल्स मध्ये भरून नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात धाव घेतली आहे. सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागात पाणी सोडण्याची वेळ ही निश्चित नसल्याने नागरिकांना आणि विशेषतः महिलांवर जागता पहारा करण्याची वेळ येत आहे.या भागातील अनेक समाजसेवक हे मासमीडियावर पाण्याची वेळ व्हायरल करत असल्याने त्यानुसार झोपमोड करून नागरिकांना पाण्याची प्रतिक्षाकरावी लागत आहे.याबाबत अनेकदा आंदोलने करण्यात आली असताना अधिकाऱ्यांना एकदाची पाण्याची वेळ निश्चित का करता येत नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रेनेजचे खोदकाम करताना पाण्याची लाईन तुटल्याने आठवडाभर नागरिकांचा घसा कोरडा राहिला होता.नागरिकांनी आंदोलन केल्यावर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी त्या स्पॉटची पाहणी करून लाईन दुरुस्त केली होती.
आता गेल्या तीन दिवसांपासून दहा चाळ नालंदा शाळे जवळील नागरिकांना पिण्याच्या पाण्यामध्ये नालीचे पाणी येत आहे.या पाण्याचा प्रचंड प्रमाणात वास येत असून नागरिकांनी हे पाणी प्यायचे कसे?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.सतीश किराणा स्टोर जवळ काही लोकांनी नाली मध्ये पाण्याची लाईन घेतली असून अधिकारी वर्ग तक्रार करूनही लक्ष देत नसून त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड.प्रशांत चंदनशिव यांनी केला आहे. तसेच काही ठिकाणी येणाऱ्या पाण्यात बारीक खडी येत आहेत.अत्यावश्यक सेवा असूनही अधिकारी वर्ग लक्ष देत नसून कुठलीही तपासणी केली जात नसल्याची खंत ॲड.प्रशांत चंदनशिव यांनी व्यक्त केली आहे. चंदनशिव यांनी नागरिकांसोबत हे पिण्याच्या पाण्याच्या येणारे नालीचे पाणी बॉटल्स मध्ये भरून महानगरपालिकेत उपअभियंता आर.एन.ठाकरे यांना दाखवल्यावर हे पाणी कनिष्ठ अभियंता हरेश मिरकुटे यांच्या सुपूर्द केले आहे.त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.