मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४६९ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार’ मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रत्येक विभागातील कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे भंगाराने अडवून ठेवलेली जागा स्वच्छ होत असून परिसर नीटनेटका दिसू लागला आहे. लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत भंगार विक्रीतून ४६९.२७ कोटी रुपये मिळाले, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.