मुंबई : उन्हाळ्याच्या अखेरीस मुंबईकरांसमोर गंभीर पाणीसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने सध्या केवळ ४० दिवस पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र, या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्याऐवजी आता आणखी गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने येत्या रविवारी रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण मुंबईतील खाजगी टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टँकर सेवा बंद करण्यामागे केंद्रीय भूजल प्राधिकरणाने भूजल उपशासंदर्भात लागू केलेले नवीन नियम कारणीभूत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या नियमांमुळे टँकर चालकांसमोर विविध कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून नियमांमध्ये सवलत देण्याची मागणी केली आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत एकही खाजगी टँकर रस्त्यावर धावणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक संकुले तसेच अनेक रुग्णालये दैनंदिन गरजांसाठी खाजगी टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे टँकर पुरवठा ठप्प झाल्यास पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार, महानगरपालिका आणि टँकर संघटनांमध्ये होणाऱ्या चर्चेकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

