तर इंग्लंडमधील साउदम्प्टन विद्यापीठातील मानवविकास आणि आरोग्य विभागाचे प्रमुख फिलिप काल्डर म्हणतात, “माशांमधील ओमेगा-3 चे शरीरावर कसे परिणाम होतात हे दाखवणारी लोकसंख्याधारित आकडेवारी आपल्याकडे आहे. ईपीए आणि डीएचए यांचं जास्त सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकारासारखे आजार आढळण्याची आणि त्यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते.”
माशांमुळे त्वचेचा रंग सुधारतो का ?
आपली त्वचा तजेलदार किंवा नितळ करण्यासाठी केवळ माशांचं सेवन केलं पाहिजे असं नसतं. आपल्या आहाराचाही उपयोग आपली त्वचा नितळ ठेवण्यासाठी आणि रंग खुलवण्यासाठी होतो. जसं की माशांमध्ये जे फॅटी ऍसिड असतात ते त्वचा नितळ ठेवण्यासाठी पूरक अशी भूमिका बजावू शकतात पण त्यासोबतच त्वचेचा पोत आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन इतर औषधही घ्यावी लागतात. तसेच “माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेसाठी चांगलं असतं. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई असतं, मात्र त्याच्या गोळ्या ही बाजारात मिळतात. त्वचा चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. पण माशांमध्ये याचे प्रमाण फार जास्त नसतं. अशावेळी आपल्याला इतर पर्याय शोधावे लागतात.” थोडक्यात त्वचेचा रंग उजळायचा म्हणून केवळ माशांचंच सेवन केलं पाहिजे असं नसतं, पण माशांमधील घटक पूरक भूमिका बजावू शकतात हे देखील तितकंच खरं आहे असे तज्ज्ञ सांगतात.
माशांमुळे बुद्धी वाढते का?
“सुधारलेलं आरोग्य आणि आजार यांनी आपल्या मेंदूची घनता बदलते. मज्जातंतूंची संख्या जितकी जास्त तितकी मेंदूची घनता जास्त असते.” सरासरी सत्तरीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या 167 व्यक्तींच्या मासे खाण्याच्या सवयी आणि एमआरआय स्कॅन यांची तुलना संशोधकांनी केली. तेव्हा त्यांना असं आढळलं की, मासे न खालेल्या सहभागी व्यक्तींपेक्षा दर आठवड्याला मासे खालेल्या व्यक्तींच्या मेंदूची घनता जास्त होती. विशेषतः त्यांच्या अग्रखंडाची (फ्रंटल लोब) घनता जास्त होती- लक्ष्य केंद्रित करण्यासाठी हा भाग महत्त्वाचा असतो. शिवाय, त्यांच्या शंखखंडाची (टेम्पोरल लोब) घनताही जास्त होती- स्मरणशक्ती, अध्ययन आणि बोधक्षमता यांच्यासाठी हा भाग कळीचा असतो. मासे शरीरातील जळजळ कमी करतात, या परिणामाशी मासे आणि मेंदू यांच्यातील संबंध घनिष्ठ जोडलेले असावेत, कारण जळजळ कमी करण्यासाठी मेंदू प्रतिसाद देतो तेव्हा त्या प्रक्रियेत मेंदूतील पेशींवर परिणाम होत असतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
मेंदू शक्य तितका चिवट व्हावा, यासाठी विशी-तिशीतल्या लोकांनी आठवड्यातून किमान एकदा मासे खायला सुरुवात करावी, असं तज्ज्ञ सुचवतात.