पुणे : पीएमपीच्या ऑनलाईन तिकीट विक्रीच्या मशीन्स व्यवस्थित काम करत नसल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मशिन्स व्यवस्थित काम करत नसल्याने वाहकांवर मशिनसह तिकीट-ट्रे ठेवण्याची वेळ येत आहे. एकूणच, पीएमपीच्या ऑनलाईन तिकीट विक्री मशीन्सचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत असून यावर पीएमपी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सातत्याने मशिन्समध्ये बिघाड होणे, ग्रामीण मार्गांवर इंटरनेट सुविधिचे अडचण असल्याने युपीआय पेमेंट न होणे, तिकीट व्यवस्थित प्रिंट न होणे,
कोरी तिकीटे निघणे अशा प्रकारच्या तिकीट विक्री प्रक्रियेत अडचणी येत असून याचा फटका वाहकांना बसत आहे. स्कॅन कोड प्रक्रियाही संथ असून सामान वाहतुकीचे तिकीट मशीनमध्ये बुक होत नाही. काही ठिकाणी एका तिकिटाच्या मागणीवर अनेक तिकिटे निघतात. त्यामुळे प्रवाशी पैसे देत नाही. परंतु, मशीनमध्ये पैसे मात्र काउंट होतात. त्याचा भुर्दंड वाहकाला बसत असल्याचे एका वाहकांकडून सांगण्यात आले. अनेकवेळा मशीन्समधील सिमकार्डचे रिचार्ज संपलेले असते. कंत्राटदारांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात येत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याबाबत आगारप्रमुखांकडून सातत्याने लेखी पत्राद्वारे आणि तोंडी तक्रारी करण्यात येतात. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नाही, याचा फटका वाहकांना आणि प्रवाशांना बसत असल्याचे दिसून येते.