मुंबई : वाढदिवस, लग्नसमारंभ, मिरवणुका आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पार्टी पॉपरमधील प्लास्टिक कन्फेटीच्या विक्री आणि वापरावर मुंबई महापालिका क्षेत्रात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरणाला तसेच शहराच्या स्वच्छतेला या प्लास्टिकच्या सूक्ष्म तुकड्यांमुळे गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत मुंबई महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी मते यांनी यासंदर्भात ठरावाची सूचना सादर केली आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहात मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. वाढदिवस, विवाहसोहळे, स्वागत समारंभ आणि विविध उत्सवांमध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी पार्टी पॉपरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पुठ्ठ्याच्या नळकांड्यासारख्या या उपकरणाची दोरी ओढल्यानंतर मोठा आवाज होतो आणि त्यातून रंगीबेरंगी प्लास्टिक किंवा कागदाचे सूक्ष्म तुकडे हवेत उधळले जातात. गेल्या काही वर्षांत या पार्टी पॉपरचा वापर लक्षणीय वाढला असून, त्यातील प्लास्टिक कन्फेटी पर्यावरणासाठी हानिकारक ठरत असल्याने त्यावर बंदी घालण्याची गरज असल्याचे नगरसेविका मते यांनी नमूद केले आहे. मुंबईला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना प्लास्टिक कन्फेटीच्या वापराकडे दुर्लक्ष होत असल्याने यावरही कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरसेविका मते यांनी मांडलेल्या ठरावानुसार, प्लास्टिक कन्फेटीचे तुकडे अत्यंत लहान असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना ते पूर्णपणे गोळा करणे शक्य होत नाही. हे तुकडे अविघटनशील असल्यामुळे पावसाचे पाणी किंवा वाऱ्याबरोबर वाहून जाऊन नाले, गटारे आणि जलवाहिन्यांमध्ये अडकतात. त्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबणे, सांडपाण्याचा निचरा विस्कळीत होणे आणि जलप्रदूषण वाढणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. शिवाय हे प्लास्टिक दीर्घकाळ पर्यावरणात तसेच जलस्रोतांमध्ये राहून प्रदूषण वाढवते. स्वच्छता राखणे, पर्यावरण संवर्धन करणे आणि पावसाळ्यात नाल्यांमधील अडथळे कमी करण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात प्लास्टिक कन्फेटीच्या विक्री आणि वापरावर बंदी लागू करावी, अशी मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे. दरम्यान, पार्टी पॉपर म्हणजे पुठ्ठ्यापासून तयार केलेले नळकांडे असून, त्याची दोरी ओढल्यानंतर मोठ्या आवाजासह रंगीबेरंगी कागद किंवा प्लास्टिकचे तुकडे हवेत उधळले जातात. उत्सवांमध्ये आकर्षण निर्माण करणारे हे साधन पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने त्याच्या वापराबाबत कठोर नियम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
