कोल्हापूर : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयसिंग पवार यांच्या निधनानं मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं एक विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या वैचारिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना आहे. डॉ. पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात अध्यापन केलं. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात झाली. या काळात त्यांनी विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण २५ पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. डॉ. जयसिंगराव पवार यांचे ४५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचं अध्यक्षस्थान भूषवलं. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक – सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.

