मुंबई : गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे / कल्याण दरम्यान रात्रीच्या वेळी लोकलच्या २२ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विनंत्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी ते ठाणे / कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याणला रात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि रात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल. कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री १ वाजता सुटेल आणि रात्री २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री २ वाजता सुटेल आणि रात्री ३ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. मुंबईत गणपती विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येेने नागरिक येत असतात. त्यामुळे हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून रात्री १.३० वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार असून ती पनवेल येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता लोकल सुटेल आणि पनवेलला पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. पनवेलहून रात्री १ वाजता विशेष लोकल सुटेल आणि रात्री २.२० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. पनवेलवरून रात्री १.४५ वाजता लोकल सुटून सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.