पुणे : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाला याप्रकरणात निंलबित करण्यात आले आहे. अनंत पाटील यांच्यावरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी कारवाई केली आहे. एफसी रस्त्यावरील एल श्री बारमधील पार्टीमध्ये मद्यविक्री प्रकरणात कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुणे एल ३ बार पार्टी प्रकरणामध्ये आतापर्यंत ४ पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत. २ पोलिस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिवाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पोलिस हवालदार गोरख डोहिफोडे, पोलीस शिपाई अशोक अडसूळ यांना निलंबित करण्यात आले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी निरीक्षक विठ्ठल बोबडे, आणि सहनिरीक्षक अनंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुण्यातील एफसी रोडवरील लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहे. या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीचे एक- एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत. या ड्रग्ज प्रकरणात हॉटेल मालक, डीजे मालकासह ८ जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष कामठे, सचिन कामठे, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय कामठे, रोहन गायकवाड, दिनेश मानकर अशी अटकेमध्ये असलेल्या आरोपींची नावं असून त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली आहे. दरम्यान, लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमधील पार्टीचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये तरुणाई पार्टी करताना दिसत आहेत. काही तरुण डीजेच्या तालावर धिंगाणा करतात तर काही दारु पिताना दिसत आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती. ४० ते ५० जण या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या हॉटेलमध्ये दारुच्या नशेत तरुणाईचा झिंगाट डान्स सुरू होता. या हॉटेलमधील पार्टीमध्ये काही तरुण आणि तरुणी ड्रग्जचे देखील सेवन करत होते. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे.