मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात आता मोठे अपडेट्स समोर आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टी राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात या पैशांचा गैरवापर केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
२०१५ मध्ये एका एनबीएफसीनं दाखल केलेल्या या प्रकरणात, त्यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसाठी दीपक कोठारी यांच्या एनबीएफसीकडून घेतलेले कर्ज संबंधित कंपन्यांमार्फत वळवून गैरव्यवहार केल्याचं प्राथमिक तपासात आणि जबाबांमध्ये समोर आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांमध्ये शिल्पा आणि राज यांनी गैरव्यवाहर केल्याचं समोर आलंय. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आता एका त्रयस्थ सल्लागाराच्या मदतीनं या पैशांचा नेमका मार्ग आणि वापर शोधण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करणार आहेत. या ऑडिटमधून पैशांचा अपहार कसा झाला आणि तो पैसा शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्याशी संबंधित असलेल्या सत्ययुग गोल्ड, व्हियान इंडस्ट्रीज, एसेंशियल बल्क कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेटमेंट मीडिया यांसारख्या कंपन्यांना देण्यासाठी वापरला गेला का, हे स्पष्ट होईल.

