महाराष्ट्र : गोवंडीतील मानखुर्द परिसरात एका १२ वर्षीय मुलावर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत हे कृत्य केले. सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलाच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. शरद साबळे असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक रहिवासी आहे. सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान ही घटना घडली. “आमचा मुलगा भेदरेल्या अवस्थेत घरी आला. अको नावाच्या माणसाने त्याच्यावर अतिप्रसंग केल्याचं त्याने घरी सांगितलं. मुलाच्या म्हणण्यानुसार, तो आमच्या गल्लीबाहेर अकोला भेटला. अकोने यावेळी भाजी खरेदीसाठी त्याला मदतीची ऑफर दिली. तो मुलाला मानखुर्दमधील सोनापूर परिसरात घेऊन गेला, तिथेच त्याने त्याच्यावर अत्याचार केला.” पीडित मुलाच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याची माहितीही कुटुंबातील सदस्याने पोलिसांना दिली.
पीडित मुलाने त्याच्यावर ओढवलेल्या आपबितीची माहिती घरी दिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आरोपीचा शोध सुरू केला असता तो त्यांना मद्यधुंद अवस्थेत आढळला. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला याबाबत जाब विचारले असता त्याने निर्लज्जपणे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी नशेत होतो, म्हणूनच मी त्या मुलाला माझ्यासोबत नेले!”या उत्तरानंतर स्थानिकांनी त्याला मारहाण सुरू केली. परंतु, पीडितेच्या नातेवाईकांनी यात हस्तक्षेप करून पोलिसांत तक्रार दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. नातेवाईकांनी आरोप केला की पोलिसांनी घटनेच्या सहा तासांनंतर एफआयआर नोंदवला. स्थानिक लोक आणि पीडितेचे नातेवाईक पोलिस ठाण्याच्या बाहेर थांबले होते. वैद्यकीय तपासणी न करता पीडित मुलाला मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. साबळेला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या अहवालात त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून त्यानं मद्यप्राशन केल्याचं सिद्ध झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे हा अंमली पदार्थांची तस्करी करत होता. त्याची जवळची नातेवाईक ‘लज्जो’ नावाची महिला अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी तडीपार आहे. असं असूनही साबळेच्या अटकेनंतर लज्जोने मानखुर्द पोलीस ठाण्यात भेट दिली होती.