ठाणे : मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये सामान्य व सक्षम प्रवाशांकडून होत असलेल्या अनधिकृत प्रवेशामुळे दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मध्य रेल्वेने दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिव्यांगांच्या डब्यात विनापरवानगी प्रवास करणाऱ्या सक्षम प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशा प्रवाशांकडून तात्काळ दंड वसूल करणे, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणे, प्रत्येक स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृतीपर सूचना देणे, प्रत्येक रेल्वे डब्यात दिव्यांग आरक्षित डब्यांबाबत माहिती प्रसारित करणे, तिकीट खिडक्यांसमोर आणि दिव्यांग डब्याजवळ मोठे माहितीफलक उभारणे तसेच दिव्यांग डबे सहज ओळखता यावेत यासाठी अधिक ठळक चिन्हांकन करण्याची मागणीही रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती.
मध्य रेल्वे प्रशासनाने या मागण्यांची दखल घेत आरपीएफ जवानांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने दिव्यांग प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवास करता येईल, तसेच आरक्षित डब्यांमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्रवेशावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. या निर्णयाचे डोंबिवली येथील साक्षात दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिन निवृत्ती गरुड, धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार आणि गिरीश मेहरोल यांनी सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने स्वागत केले असून खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले आहेत. दिव्यांग नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचा सुरक्षित आणि सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपला पाठपुरावा भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

