मुंबई : मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेने रविवारी (८ जून) सेवेत १२ वर्षे पूर्ण केली. ११.४ किलोमीटर लांबीची आणि १४ स्थानकांनी सज्ज असलेली ही मार्गिका ८ जून २०१४ रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेशात आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पातील ही पहिली मार्गिका होती. २००८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आणि सहा वर्षांच्या कालावधीनंतर मुंबईकरांसाठी पहिली मेट्रो धावू लागली. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा प्रतिसाद मर्यादित असला तरी कालांतराने या मार्गिकेची लोकप्रियता वाढत गेली. आज या मार्गिकेवरून दररोज सुमारे पावणेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गर्दीच्या वेळेत चार डब्यांच्या गाड्या अपुऱ्या पडत असून सहा डब्यांच्या मेट्रोची मागणी जोर धरत आहे. मार्गिकेच्या संचालनाची जबाबदारी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) यासाठी प्रयत्न सुरू असले तरी आर्थिक अडचणींमुळे हा प्रस्ताव अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही.
गेल्या १२ वर्षांत मेट्रो १ मार्गिकेवर १५ लाखांहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्या असून तब्बल १२५ कोटी प्रवाशांनी या सेवेद्वारे प्रवास केला आहे. या कालावधीत मार्गिकेने ९९.९९ टक्के वक्तशीरपणा राखला असून एकही अपघाती मृत्यू नोंदवला गेलेला नाही, ही तिची मोठी उपलब्धी मानली जाते. काही किरकोळ दुर्घटना घडल्या असल्या तरी सुरक्षिततेच्या बाबतीत मार्गिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी एमएमओपीएलने राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुविधा सुरू केली आहे. याशिवाय ‘ऑन द गो’ कार्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधांमुळे प्रवाशांना मेट्रो १ बरोबरच मेट्रो २अ, मेट्रो ७, मेट्रो ३, बेस्ट बस आणि मोनोरेल सेवांचा वापर एकाच कार्डद्वारे करता येणार आहे. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, एकात्मिक आणि प्रवासी-केंद्रित बनण्यास मदत होणार आहे.

