वृत्तसंस्था : मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचत राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित या ऐतिहासिक महाकाव्याने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांवरील आपली मोहिनी कायम ठेवली आहे. भव्यदिव्य दृश्यरचना, ऐतिहासिक वास्तवता आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर आणि परदेशातही चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या २० व्या दिवशी भारतात २,२०४ शोजमधून १.१० कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, भारतातील एकूण नेट कलेक्शन ८८.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन १०४.१९ कोटी रुपये झाले आहे. मराठी चित्रपटासाठी हा आकडा अत्यंत उल्लेखनीय मानला जात असून, या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीच्या व्यावसायिक क्षमतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. परदेशातही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, ओव्हरसीज मार्केटमधून ४.१५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’चे एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन तब्बल १०८.३४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
चित्रपटाच्या कमाईचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ७.७० कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या वीकेंडला १७.४० कोटी रुपयांचा टप्पा गाठला. ११ व्या ते १४ व्या दिवसादरम्यान चित्रपटाने दररोज सरासरी २ ते २.७५ कोटी रुपयांची स्थिर कमाई केली. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाने जोरदार कामगिरी करत १५ व्या दिवशी १.४५ कोटी, तर १६ व्या आणि १७ व्या दिवशी अनुक्रमे २.७० आणि ३.४५ कोटी रुपयांची कमाई नोंदवली. या चित्रपटाच्या यशामागे दमदार कलाकारांची फळी आणि तांत्रिक भव्यतेचाही मोठा वाटा आहे. जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांनी आपल्या अभिनयाने कथानकाला वेगळेच वजन दिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन अप्रतिम छायांकन आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाचा अनुभव अधिक प्रभावी ठरत आहे.

