मुंबई : परिचारिका आणि निमवैद्यकीय अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन Municipal Corporation of Greater Mumbai ने वांद्रे येथे स्वतंत्र नर्सिंग महाविद्यालय आणि संलग्न निमवैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार असून, खासगी भागीदाराला आराखडा तयार करणे, बांधकाम, संचालन आणि हस्तांतरण या सर्व टप्प्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावरील सुमारे २३२७.४२ चौरस मीटर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी किमान १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले नर्सिंग महाविद्यालय तसेच विविध निमवैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
या संस्थेमुळे के. बी. भाभा रुग्णालय तसेच वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात प्रशिक्षणाची संधी मिळणार असल्याने शिक्षणासोबत व्यावहारिक अनुभवही मिळणार आहे. प्रकल्पासाठी ४ एफएसआय मंजूर करण्यात आला असून, भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. सुरुवातीचा एकरकमी हफ्ता ५.२९ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर वार्षिक भाडे २,३५० रुपये असून दर १० वर्षांनी त्यात १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. करारानंतर एका वर्षात बांधकाम सुरू करून तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करणे, चार वर्षांत मान्यता मिळवणे आणि पाच वर्षांत शिक्षण सुरू करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी अर्ज करणाऱ्या संस्थेकडे किमान पाच वर्षांचा नर्सिंग शिक्षणाचा अनुभव, ५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली संस्था चालवण्याचा अनुभव, तसेच मागील तीन वर्षांत सरासरी ५० कोटी रुपयांची उलाढाल आणि किमान २० कोटी रुपयांची निव्वळ मालमत्ता असणे आवश्यक आहे. तसेच, नर्सिंग आणि इतर निमवैद्यकीय अभ्यासक्रमांमधील २० टक्के जागा महानगरपालिकेसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, या जागांची माहिती दर्शविणारा डिजिटल फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

