ठाणे : ग्रामीण व आदिवासी भागातील माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी, अचूक आणि वेळेत पोहोचाव्यात यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभागामार्फत ‘आशा स्पर्श’ हे अत्याधुनिक मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. आशा सेविकांसाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. आशा सेविकांच्या दैनंदिन क्षेत्रीय कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड देत सेवा गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गर्भवती महिला, नवमाता व नवजात बालकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या घरभेटी, तपासण्या, लसीकरण नोंदी, पोषण सल्ला, सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन आदी जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडाव्या लागतात. “आशा स्पर्श ” अॅपच्या माध्यमातून या सर्व कामकाजाचे डिजिटल व्यवस्थापन शक्य होणार असून कोणत्या लाभार्थ्याला कधी भेट द्यायची, कोणत्या तपासण्या प्रलंबित आहेत, लसीकरणाची तारीख कोणती, उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची नोंद यासारखी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
या अॅपमुळे कागदी नोंदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन माहितीचे डिजिटल संकलन अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. आरोग्य विभागाला प्रत्यक्ष क्षेत्रातील अद्ययावत माहिती तत्काळ उपलब्ध होणार असल्याने नियोजन, देखरेख आणि आढावा प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल. यामुळे सेवा पुरवठ्यात सुसूत्रता येऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्हा परिषद यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. भविष्यात या अॅपमध्ये आणखी नाविन्यपूर्ण सुविधा समाविष्ट करून आरोग्य व्यवस्थेचा डिजिटल विस्तार करण्याचा मानस आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे म्हणाले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲप्लिकेशनचा विकास करण्यात आला आहे. आशा स्पर्श मोबाईल अॅप्लिकेशनमुळे आशा सेविकांच्या दैनंदिन कामकाजात लक्षणीय सुलभता येणार आहे. माता व बाल आरोग्य सेवांशी संबंधित सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यामुळे सेवा देण्याची प्रक्रिया अधिक अचूक, नियोजित व वेळेत पूर्ण करता येणार आहे. चॅटबोट सुविधेमुळे आशा सेविकांना तत्काळ मार्गदर्शन मिळून क्षेत्रीय पातळीवरील निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि परिणामकारक आरोग्य सेवेच्या दिशेने ठाणे जिल्हा परिषदेकडून उचललेले हे पाऊल ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया परगे यांनी दिली आहे. ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेली चॅटबोट सुविधा ही विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे. आशा सेविकांना त्यांच्या कामाशी संबंधित नियमावली, शासकीय निर्देश, आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचना किंवा क्षेत्रीय अडचणींबाबत त्वरित मार्गदर्शन या सुविधेद्वारे मिळणार आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि अचूक होईल. माता व बाल आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गर्भवती महिलांची नियमित तपासणी, उच्च जोखमीच्या प्रकरणांचे वेळेवर निदान, सुरक्षित प्रसूतीसाठी योग्य संदर्भ सेवा, नवजात बालकांची काळजी, संपूर्ण लसीकरण व पोषणविषयक सल्ला या सर्व बाबी अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. परिणामी माता व बाल मृत्यूदर कमी करण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल.

