ठाणे : लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘१६ वा राष्ट्रीय मतदार दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. “माझा भारत, माझे मत, मी भारत आहे” या मुख्य संकल्पनेवर आधारित हा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी(रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (मेट्रो सेंटर) वरुणकुमार सहारे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, उमेश पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार स्मितल यादव, निवडणूक दूत नीता केणे (किन्नर अस्मिता), अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिटीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक शाखेतील इतर अधिकारी-कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली.

