वसई : मकरसंक्रांतीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बाजारात पतंग व मांजा ही विक्रीसाठी आले आहेत. मात्र या काळात नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने शहरात नायलॉन मांज्याचा वापर व विक्री यावर बंदी घातली आहे. याशिवाय छुप्या मार्गाने नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
वसई विरार शहरात मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध ठिकाणी आयोजित केले जाणारे पतंग महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळेसध्या शहरात पतंगोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे. अवघ्या आठ दिवसांवर मकरसंक्रात आल्याने शहरात विविध ठिकाणच्या भागात पतंग व मांजा विक्रीसाठी आले आहेत. तर दुसरीकडे नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी असतानासुद्धा काही ठिकाणी छुप्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री आणला जात आहेत. त्यामुळे काहीजण पतंग उडविण्यासाठी नायलॉनच्या मांज्याचा वापर करतात. नायलॉन मांजा हा प्लास्टिकपासून तयार करण्यात येतो. त्याच्या वापरामुळे पशु पक्षी मांज्याला अडकून जखमी होतात तर काहीवेळा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा दुखापत होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच हा मांजा विद्युत तारांमध्ये अडकल्यास विद्युत प्रवाह खंडीत होण्याच्या तसेच एखादी मोठी दुर्घटना देखील घडू शकतात. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांकडून नायलॉन माझ्या वापर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित नायलॉन मांज्याची विक्री व वापर करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम १६३ (१) (२) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उप आयुक्त अशोक विरकर यांनी पत्राद्वारे दिली आहे.

