ठाणे : ठाणे, नवी मुंबई लगत असलेल्या पनवेल आणि भिवंडीत अवघ्या ४ लाख रुपयांत जमीन मिळेल असे सांगून अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत नऊजण तक्रारीसाठी पुढे आले आहेत. फसवणूक झालेल्या व्यक्तिंची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २०२३ मध्ये त्यांना जागा विक्रीची जाहिरात माध्यमांद्वारे प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनी कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात जागा विक्री करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात स्वत: जाऊन विचारणा केली. त्यावेळी त्यांना कंपनीच्या कार्यालयात सात अधिकारी भेटले. त्यांनी पनवेल येथील चिर्ने भागात दोन गुंठ्याची जागा चार लाख रुपयांत विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांना कंपनीच्या प्रतिनिधींनी जागा दाखविली. जागा पंसत पडल्याने तक्रारदार यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तर वर्षभराने दोन लाख रुपयांचा दुसरा धनादेश दिला. त्यानंतर तक्रारदार हे वारंवार जागेबाबत विचारणा करु लागल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती दिली जात नव्हती. काही दिवसांनी ती जागा देऊ शकत नाही असे कंपनीने सांगितले.
त्याबदल्यात त्यांना भिवंडी येथील केवणी दिवा येथे जागा देणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून नोंदणीसाठी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कंपनीच्या प्रतिनिधींना दिला. नोंदणीसाठी पैसे दिल्यानंतरही जागा दिली जात नव्हती. याबाबत तक्रारदार हे अनेकदा कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नव्हते. तक्रारदार यांच्याप्रमाणे आणखी आठ जणांची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आल्याचे यावेळी उघडकीस आले. ही रक्कम ६४ लाख ५६ हजार इतकी होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात कंपनीच्या प्रतिनिधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरंक्षण) अधिनियम, १९९९ चे कलम ३,४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३ (५), ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

