नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरी गावात एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका घरातून ३४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन घराची झडती केली. धक्कादायकरित्या त्याच्या घरातून दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त ड्रग्ज आढळून आले आहे. या ड्रग्सची किंमत बाजारमूल्यानुसार १ कोटी ३६ लाख रुपये एवढी आहे. हे हिरॉईन ड्रग्स सध्या पोलिसांनी जप्त केले आहे.
मागील काही दिवसांपासून माहिती मिळत असल्याने कोपरी गावात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने जाळे रचून छापा टाकला. या प्रकरणी ३४ वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह यास ताब्यात घेतले असून त्याच्या घरातून १ कोटी ३६ लाख बाजारमूल्य असलेला ड्रग्ज (हिरॉईन) हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत हे ड्रग्स पंजाबमधून रेल्वे, ट्रकद्वारे आणून महाराष्ट्राच्या अनेक भागासह नवी मुंबईतील तरुणांना विक्री केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक केली असली तरी यात अनेकजण सामील असल्याचा संशय असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र नवी मुंबई पोलिसांचे ड्रग्ज मुक्त नवी मुंबई अभियान सुरू असताना अशा कारवाया होत आहेत, ज्यात करोडो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला असे ड्रग्ज सप्लायर्स घाबरत नसल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकची माहिती देताना, आम्ही अनेक संशयित ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात केले असून आणि अशा काही नागरिकांना असे संशयित व्यक्ती आढळल्यास आम्हाला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क रहावे असेही पोलिसांनी सांगितले आहे.

