ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात अंमली पदार्थाची खरेदी-विक्रि जोरात सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अंमली पदार्थांचा हा व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहीम राबवली जात असल्याने गेल्या ११ महिन्यात ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून चार कोटी एक लाख ९४ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हा आकडा मोठा असला तरी प्रत्यक्षात याहून अधिक प्रमाणात या पदार्थांची तस्करी जिल्ह्यात सुरु असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. या समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एकूण ४ कोटी १ लाख ९४ हजार ७१८ रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या ७२३ गुन्ह्यांमध्ये एकूण ८५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रि, वाहतूक यासंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्याविषयीची बैठक नुकतीच ठाणे पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्याच्या सूचना ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.