मुंबई : अडचणीत असलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांतील फलाटांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. मुंबई विभागात सर्वप्रथम भायखळा स्थानकामध्ये हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे. महिलांसह सर्वच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सध्या नावीन्यपूर्ण उपायांची चाचपणी करण्यात येत आहे. रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व टॉकबॅक यंत्रणा बसविल्यानंतर आता फलाटांवर पॅनिक बटन कार्यान्वित करण्यात येणार आहे. ‘११७ रेल्वे स्थानकांतील प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन बसवण्यात येत आहे’, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितले. यापैकी ७० रेल्वे स्थानके मुंबईतील आहेत. भायखळा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर महिला डबा येणाऱ्या ठिकाणी हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे. फलाटाच्या सीएसएमटीकडील बाजू आणि ठाण्याकडील बाजूला प्रत्येकी एक बटन आहे. बटन दाबताच तेथील सीसीटीव्ही कॅमेरा संबंधित व्यक्तीला हेरून त्याची हालचाल टिपतो. तसेच याची माहिती स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळते, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ईमर्जन्सी टॉक बॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. ‘सध्या ७७१ महिला डब्यांपैकी ५१२ डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा सुरू झाली आहे. ४२१ डब्यांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थात ३१ मार्च, २०२४पर्यंत टॉकबॅक आणि सीसीटीव्ही यंत्रणा सर्व डब्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल’, असे महाव्यवस्थापक राम यादव यांनी सांगितले.
अशी आहे यंत्रणा
– फलाटाच्या दोन्ही दिशांना पॅनिक बटन
– महिला डब्यासमोर सहज दिसणाऱ्या ठिकाणी बसवणार
– बटन दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटणार
– फलाटावरील सीसीटीव्ही संबंधित प्रवाशाला टिपणार
– आरपीएफ आणि नियंत्रण कक्षापर्यंत माहिती पोहोचणार