डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम अज्ञात इसमाने एटीएम मशिन कटरच्या साहाय्याने फोडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर चोरटा पळून गेला. दरम्यानच्या काळात एटीएम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन एटीएम मशीनसह त्यामधील २१ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली. ही माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एटीएमचे परिचालन करणाऱ्या इलेक्ट्रिक पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिमला ही माहिती दिली. तेथील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीने डोंबिवलीत येऊन एटीएम मशीनची पाहणी केली. तोपर्यंत एटीएममधील रोख रक्कम जळून खाक झाली होती आणि एटीएम मशीन जळले होते.
पोलिसांनी सांगितले, महात्मा फुले रस्त्यावर साई बाबा चौकात अर्जुन सोसायटीत स्टेट बँकेचे एटीएम मशीन आहे. चोरट्याने एटीएम मशीनमधील रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने एटीएम खोलीत प्रवेश केला. धारदार कटरच्या साहाय्याने त्याने एटीएम मशीन फोडून रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचे संरक्षक कवच कठीण असल्याने ते चोरट्याला तोडता आले नाही. त्याचे एक तासाचे प्रयत्न अयशस्वी झाले. मशीन तुटत नाही म्हणून चोरटा निघून गेला. मशीनची तोडफोड झाल्याने आतील विद्युत यंत्रणा गरम झाली. या अति उष्णतेने मशीनमधील रोख रक्कम संरक्षित पेटीसह एटीएम मशीनचा आतील भाग पूर्ण जळून खाक झाला. या प्रकरणी एटीएमचा मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे तपास करत आहेत.