मुंबई : दुबईहून न्हावा शेवा बंदरात आणलेल्या कंटेनरमधून १० कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. कार्पेटच्या नावाखाली सिगारेटची तस्करी करण्यात येत होती. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करत आहे. न्हावा शेवा बंदरात विदेशी सिगारेटचा साठा येणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने शोध मोहीम राबवली. यादरम्यान चायनीज व्हिस्कोस कार्पेट म्हणून घोषित केलेल्या मालामध्ये असलेला विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यास यश आले. त्यात जवळपास ६७ लाख २० हजार सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटी आठ लाख रुपये आहे.
दुबईच्या जेबेल अली बंदरावरून सिगारेटचा साठा न्हावा शेवा बंदरात पाठवण्यात आला होता. त्यात कोरियामध्ये तयार केलेल्या सिगारेटचा समावेश आहे. केंद्रीय यंत्रणांपासून लपविण्यासाठी तस्करांनी कागदोपत्री कार्पेट असल्याचे घोषित केले होते. याबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे.