मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. दुसरीकडे भाजपच्याही गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही कामाला लागला आहे. असं असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. हे शिष्टमंडळ मुंबईतील आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेमके कोण नेते असणार, विशेषत: ठाकरे गटातील कोणते नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीचं शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागील कारण म्हणजे इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होऊ घातलेली बैठक. इंडिया आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. यातली पहिली बैठक ही पाटण्यात पार पडली होती. तर दुसरी बैठक बंगळुरुत पार पडली होती. त्यानंतर आता तिसरी बैठक ही मुंबईत नियोजित आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वारंवार बैठका पार पडत आहेत. या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बैठकीसाठी मुंबईतील नियोजनाबाबत आणि पोलीस सुरक्षेबाबत मविआचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.