नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तर्ण असा खाडी किनारा पसरला असल्यानं या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी येतात. सुरुवातीला फक्त थंडीच्या काळात येणारा फ्लेमिंगो पक्षाला येथील वातावरणाबरोबर खाद्य मिळू लागल्यानं जवळपास ८ ते १० महिने फ्लेमिंगोचा मुक्काम या ठिकाणी पडू लागला आहे. नेरूळ येथील चाणक्य तलाव आणि डिपीएस स्कूलच्या शेजारील तलावात यांचा अदिवास मोठ्या संख्येनं दिसून येतो. परदेशातून येणाऱ्या या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी नवी मुंबई बरोबर मुंबई, ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येनं येत असतात. मात्र आता ही आरक्षीत असलेली पाणथळ जागा संपवण्याचा निर्णय नवी मुंबई महानगर पालिकेनं घेतला आहे. जवळपास ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभा राहणार आहे. फ्लेमिंगोच्या आदिवासी जागेवर सिमेंटचं जंगल उभं राहणार असल्यानं याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. महानगर पालिकेनं पाणथळ जागांचं आरक्षण कायम न ठेवल्यास याबाबत आपण न्यायालयात जावू, असा इशारा पर्यावरण प्रेमी सुनिल अग्रवाल आणि भारत गुप्ता यांनी दिला आहे.
नेरूळ येथील आरक्षीत पाणथळ जागेवरील आरक्षण उठवण्यास पर्यावरण प्रेमींबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटानंही विरोध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सिवूड येथील पानथळ जागेस भेट देऊन पाहणी केली होती. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण पर्यावरण प्रेमींबरोबर असल्याचं सांगत मनपाच्या भुमिकेवर शंका व्यक्त केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या उद्योगपतींसाठी पाणथळ असलेली जमीन निवासी संकूलासाठी आंदन दिली जाणार असल्यानं या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे सिवूड विभागप्रमुख समीर बागवान यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनानं ३०० हेक्टर पानथळ जागेवरील आरक्षण उठवून बिल्डरांना आंदन दिलं असलं तरी यावर राजकीय पक्ष मात्र मूग गिळून गप्प आहेत.