ठाणे : शिळ डायघर येथील कल्याण शिळ रोड भागात खड्ड्यात दुचाकी जाऊन तोल गेल्याने एका दुचाकीस्वाराला मागून भरधाव मोटारीने धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार सागर मिसाळ (२२) याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून संताप व्यक्त केला जात आहे. सागर मिसाळ हा रात्री २ वाजताच्या सुमारास नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. तो कल्याण शिळ मार्गावरील मातेश्वरी अल्टुरा गृहसंकुल परिसरात आला असता, मुख्य रस्त्यावर खड्डा पडलेला होता. या खड्ड्यात त्याची दुचाकी गेली. त्यामुळे त्याचा दुचाकीवरुन तोल गेला. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एका मोटारीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला तसेच अंतर्गत जखमा झाल्या. त्याला उपचारासाठी देसाई गाव भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला या अपघाताची नोंद अपमृत्यू म्हणून करण्यात आली होती. सागर यांच्या नातेवाईकांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याच्या मामांनी याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात सर्वच महत्त्वाच्या मार्गांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवर तात्पुरती दुरुस्ती करुन ते भरले जातात. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.