कल्याण : उन्हाळा, पावसाळा किंवा कडाक्याची थंडी अशा कोणत्याही ऋतूची पर्वा न करता वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकांना ताजा भाजीपाला, फुले आणि रानमेवा उपलब्ध करून देणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानासाठी कल्याणमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कल्याण शाखेच्या वतीने अधिक मासानिमित्त शहरातील विविध भागांत व्यवसाय करणाऱ्या ३३ कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. पारनाका, दुधनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक आणि लालचौकी परिसरात भाजीपाला व फुले विक्री करणाऱ्या महिलांचा या सन्मानात समावेश होता. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कल्याण शाखेकडून नियमितपणे सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्नही संस्थेकडून केला जातो. यंदा अधिक मासाच्या निमित्ताने शहरातील मेहनती आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिला विक्रेत्यांचा गौरव करण्याची संकल्पना संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मांडली. या कल्पनेला सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कल्याण शहरातील विविध भागांत व्यवसाय करणाऱ्या या महिला कोन, उंबर्डे, सापर्डे, आमणे आणि भिवंडी ग्रामीण भागातील इतर गावांतून दररोज ताजा भाजीपाला, फुले आणि रानमेवा घेऊन शहरात येतात. अनेक महिला वड, पिंपळ यांसारख्या झाडांच्या सावलीत किंवा चौक, इमारती आणि विजेच्या खांबांच्या आडोशाला बसून सकाळपासून दुपारपर्यंत विक्री करतात. त्यांच्या मेहनतीमुळे शहरातील नागरिकांना ताजा आणि नैसर्गिक भाजीपाला उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक ग्राहक अशा महिलांकडूनच भाजीपाला खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
या महिला पहाटेपासून शेतातील कामे करून त्यानंतर शहरात येऊन व्यवसाय करतात. कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी त्या सातत्याने मेहनत घेत असतात. उन्हाची तीव्रता, मुसळधार पाऊस किंवा थंडीची झळ यांचा सामना करत त्या आपला व्यवसाय प्रामाणिकपणे सुरू ठेवतात. त्यांच्या या अथक परिश्रमांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कष्टांविषयी समाजात आदराची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने संघटनेने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिलेला साडी, मिठाई, घरगुती वापराच्या आवश्यक वस्तू आणि स्टीलची पाण्याची बाटली अधिक मासाचे वाण म्हणून भेट देण्यात आली. कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक झालेल्या या सन्मानामुळे महिलांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. आपल्या दैनंदिन संघर्षाची आणि मेहनतीची समाजाकडून दखल घेतली जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. या कार्यक्रमाला देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सारंग केळकर आणि गुंतवणूक सल्लागार संकेत कुलकर्णी यांनीही कार्यक्रमात सहभागी होत या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील कष्टकरी आणि गरजू घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्येही अशाच स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आला होता. तेथे कष्टकरी, विधवा, परित्यक्ता आणि गरजू महिलांना आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या दोन्ही उपक्रमांचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, समाजातील मेहनती घटकांना प्रोत्साहन देणाऱ्या या प्रयत्नांचे व्यापक कौतुक केले जात आहे.

