उल्हासनगर : दाटीवाटीचा भाग मोकळा आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले प्रभाग मुकादम आर्थिक आमिषाला बळी पडत शहरात आणखी अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यातूनच प्रभागात शोरमा या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चार गाड्या सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच मागून त्यातील दोन हजारांची लाच स्वीकारताना प्रभाग क्रमांक चारचा प्रभारी मुकादम संजय पेडामकर यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरात ६० टक्क्यांहून अधिकचा भाग हा दुकाने आणि बाजारपेठांचा आहे. त्यामुळे दररोज येथे शेकडो वाहने, हजारो ग्राहक तसेच व्यापारी येत असतात. त्यामुळे शहरातील बाजारपेठेतील बहुतांश रस्ते कोंडीत अडकतात. या रस्त्यांवर आणि विशेषतः बाजारपेठांमध्ये तितक्याच प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेते, लहान मोठ्या वस्तूंची विक्री करणारे हातगाडीवालेही असतात. यांच्यामुळे अनेकदा रस्त्यांचा मोठा भाग व्यापला जातो. या ठिकाणी आलेले ग्राहक, त्यांची वाहने यामुळे कोंडी आणि अस्वच्छताही वाढते. त्यातून मार्ग काढत सर्वसामान्य वाहने आणि पादचाऱ्यांना जावे लागते. हे फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्यात उल्हासनगर महापालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करते. त्यामुळे पालिकेच्या आशीर्वादानेच या हातगाड्या सुरू असल्याचा आरोप केला जात असतो. मात्र नागरिकांच्या आरोपांना पुष्टी देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या प्रभाग समिती मुकादमावर अनधिकृत फेरीवाल्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, त्याच मुकादमाने चार अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्या चालू देण्यासाठी लाच मागितली. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारचे प्रभारी मुकादम संजय धाकू पेडामकर यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.
उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात अनधिकृत शोरमा विक्रीच्या चार गाड्या उभ्या करण्याकरिता तीन हजार रुपयांची लाचेची मागणी करून सुरुवातीला ५०० रुपये तर २ हजार ५०० रुपये १० जानेवारीला घेण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हा प्रकार कळवला. त्यानंतर सापळा रचून दोन हजार रुपयांची लाच घेताना महापालिका मुकादम संजय पेडामकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पेडामकर यांच्यावर हिललाइन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.