वृत्तसंस्था : ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे. त्यांनी त्यांच्या आहारात वेळोवेळी पत्थ्य पाळणं गरजेचं आहे. तसेच रोज सकाळी उठल्यावर रक्तदाब तपासणे सुद्धा महत्वाचे आहे. कारण या आजारावर फक्त गोळ्या औषधंच नाही तर काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. विशेषतः झोपण्याआधी काही पेये रोज सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो आणि सकाळी रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र हा उपाय औषधांचा पर्याय नाही.
बीटा ज्यूस हा रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या सैल होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्यांवरचा दाब कमी होतो. पण किडनीच्या (Kidney)समस्या असलेल्या याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं. कॅमोमाईल चहा हा शरीराला शांत करणारा आणि मनाला आराम देणारा मानला जातो. जो डेझीसारख्या दिसणाऱ्या कॅमोमाईल फुलांपासून बनवलेला कॅफीन-मुक्त चहा आहे. तणाव हे उच्च रक्तदाब वाढण्यामागचं एक मोठं कारण असतं. कॅमोमाईल चहा प्यायल्याने मन शांत होतं, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि त्यामुळे रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की कॅमोमाईल चहा घेतल्याने LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होते. दुधाचं सेवन सुद्धा रक्तदाब नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकतं. लो-फॅट किंवा स्किम दूध प्यायल्याने हृदयाचं कार्य सुधारतं. अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की रोज दूध पिणाऱ्या लोकांचा सिस्टोलिक रक्तदाब, दूध न पिणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे १० mmHg पर्यंत कमी असू शकतो.

