बोईसर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई तालुक्यांत तीन नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नागरिकांना विविध महसुली सेवा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कासा, बोईसर आणि विरार येथे ही कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय २२ सप्टेंबर रोजी महसूल विभागाने प्रसिद्ध केला. शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप, अपुरा अधिकारी-कर्मचारी वर्ग, तालुक्यांचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कार्यालयांमुळे तहसील कार्यालयांचे कामकाज अधिक सक्षम होऊन नागरिकांना महसुली सेवा जलद आणि सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे.
डहाणू तालुक्यातील कासा, पालघर तालुक्यातील बोईसर आणि वसई तालुक्यातील निळेमोरे येथे कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, शासन निर्णयानुसार वसई तालुक्यातील कार्यालय निळेमोरेऐवजी विरार येथे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालघर तालुक्यातील १० महसुली मंडळांपैकी बोईसर, तारापूर, लालोंडे आणि मनोर या चार मंडळांचा बोईसर अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. डहाणूतील नऊ मंडळांपैकी कासा, सायवन आणि चारोटी या तीन मंडळांचा कासा कार्यालयात समावेश होणार आहे. विरार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विरार, आगाशी, मांडवी आणि बोळींज या चार मंडळांचा समावेश असेल. पालघर आणि डहाणू तालुक्यांचा मोठा भौगोलिक विस्तार असून, अनुक्रमे २०३ आणि १७४ महसुली गावे आहेत. अनेक नागरिकांना महसुली कामांसाठी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र प्रशासकीय सुविधा निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. दरम्यान, मनोर मंडळाचा बोईसर कार्यालयात समावेश केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मनोर परिसरातील नागरिकांनी लेखी हरकती नोंदवून मनोरचा पालघर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील समावेश कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, या हरकतींवर सुनावणी न घेता मनोरचा बोईसरच्या कार्यक्षेत्रात समावेश केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

