मुंबई : देशभरातील बँक कर्मचारी २८ सप्टेंबरपासून पुकारण्यात आलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी संपावर जाणार होते. मात्र, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर हा संप सध्या स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान नियोजित संप होणार नसून देशभरातील बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी संपाची घोषणा केली होती. मात्र, संपाच्या आदल्या दिवशी झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संप तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाखो ग्राहकांची गैरसोय टळली असून आर्थिक व्यवहार, धनादेश, रोख व्यवहार, कर्ज प्रक्रिया आणि इतर बँकिंग सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत. सलग पाच दिवस बँका बंद राहू नयेत आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी रविवारीही अनेक बँकांनी विशेष कामकाज सुरू ठेवले होते. चौथा शनिवार असल्याने शनिवारी बँका बंद होत्या. त्यानंतर संपामुळे सोमवारीपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता होती. मात्र, संप स्थगित झाल्याने हा धोका टळला आहे. बँक कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी म्हणजे देशभरातील बँकांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करणे. याशिवाय पेन्शनधारकांसाठी सुधारित लाभ, सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना समान महागाई भत्ता (DA) धोरण लागू करणे, तसेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, रिझर्व्ह बँक, एलआयसी, जीआयसी आणि नाबार्ड यांसारख्या अनेक सरकारी संस्थांमध्ये आधीपासूनच पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनाही समान सुविधा मिळाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, सरकार आणि IBA यांच्यासोबत पुढील चर्चेनंतर या मागण्यांवर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

