पुणे : पुणे पोलीस दलातील दोन महिला पोलीस शिपायांनी ३० ऑगस्ट रोजी नियोजित केलेला विवाह तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विवाहासाठी रजेचा अर्ज आणि लग्नपत्रिका पोलीस विभागाकडे सादर केल्यानंतर या विवाहाची माहिती सार्वजनिक झाली. त्यानंतर सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. या वाढत्या चर्चेसह निर्माण झालेल्या सामाजिक दबावामुळे दोघींनी सध्या विवाह सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोघींचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असून पोलीस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान त्यांची पहिली ओळख झाली होती. भरतीची परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि इतर सर्व टप्पे पार केल्यानंतर दोघींचीही पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. योगायोगाने सुरुवातीला दोघींनाही पोलीस मुख्यालयातच नियुक्ती मिळाली. काही काळ त्या इतर महिला कर्मचाऱ्यांसोबत एकाच निवासस्थानी राहत होत्या. पुढे बदलीनंतर दोघी एकाच ठिकाणी राहू लागल्या आणि त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. कालांतराने या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या तीन वर्षांपासून त्या परस्पर संमतीने समलिंगी नात्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेत ३० ऑगस्ट रोजी आळंदीत वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे नियोजन केले होते. लग्नासाठी आवश्यक रजा मिळावी म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज सादर केला आणि त्यासोबत विवाहपत्रिकाही जोडली. याच प्रक्रियेदरम्यान दोघी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती विभागासह इतरत्रही पोहोचली. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघींमधील एक महिला पोलीस उत्तर महाराष्ट्रातील असून दुसरी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील आहे. विवाहाची माहिती संबंधित कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यापैकी एका कुटुंबाने या विवाहाला विरोध केल्याची चर्चा आहे. तसेच दुसऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुंबईतील एका रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियेसंदर्भात उपचार सुरू केल्याचेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन विवाह थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, हा दोन सज्ञान व्यक्तींचा परस्पर संमतीने घेतलेला वैयक्तिक निर्णय असल्याने पोलीस प्रशासन अशा खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना, रजेच्या अर्जासोबत लग्नपत्रिका जोडल्यामुळेच विभागाला या विवाहाबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. विवाहाची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. वाढत्या प्रसिद्धीमुळे आणि सामाजिक दबावामुळे दोघींनी सध्या विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलात तसेच समाजात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, संबंधित दोघींनी परिस्थिती शांत झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
