नवी दिल्ली : देशाचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना असणार आहेत . येत्या ११ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. आत्तापर्यंत देशाला ५० सरन्यायाधीश लाभले होते. आता न्यायमूर्ती खन्ना हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड हे लवकरच निवृत्त होत आहेत. त्यानुसार, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. सरकारने मावळत्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून ‘मेमोरँडम ऑफ प्रोसिजर’नुसार त्यांच्या शिफारसी पाठवण्यास सांगितले होते. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार आहेत.
सरन्याधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव पुढे होते. कारण, त्यांची ज्येष्ठता आहे. त्यामुळे न्यायमूर्ती खन्ना यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे २७५ खंडपीठांचा भाग राहिले आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. ते ११ नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली. विद्यमान सरन्याधीश डी. वाय. चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनीच न्यायमूर्ती खन्ना यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. त्यानुसार, आता ही निवड केली जात आहे.
देशाचे ५० वे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतरच्या योजनांबाबत विचारले असता, सुरुवातीचे काही दिवस विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. डी. वाय. चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आणि १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते पदावरून निवृत्त होतील.