ठाणे प्रतिनिधी : बदलापूर शाळालैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आलं होतं. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर आरोपी नराधम अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, काल अक्षय़ शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणावर आता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यातून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला, यासंदर्भात तपशीलवार माहिती उपलब्ध नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, हे प्रकरण गंभीर आहे. आरोपीचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत असताना झाला आहे, त्यातही तो गोळीबारात ठार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
आज जी माहिती उपब्लध आहे, त्यानुसार आरोपीने पोलिसांजवळचं शस्त्र हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. पण याची सत्यता किती आहे, हे न्यायालयीन चौकशीत पुढं येईल. तसंच पोलिसांनी स्वत:कडं असलेली बंदूक लॉक केली होती का? आरोपीला हातकडी लावण्यात आली होती का? ही बाब तपासली जाईल, असंही ते म्हणाले. पुढे बोलताना, एन्काऊंटर होणं हे केव्हाही वाईट आहे. परंतु, पोलिसांना कोणत्या परिस्थितीत गोळीबार करावा लागला याची निश्चितपणे चौकशी होईल, यात कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही असंही उज्वल निकम म्हणाले आहेत.