ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये ठाणे जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. जिल्ह्यातील एकूण ३९५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये इयत्ता पाचवीचे ३८४ आणि इयत्ता आठवीचे ११ विद्यार्थी आहेत. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६६० शाळांमधून ५ हजार १९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ६७० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. एकूण ३८४ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १५२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली आहे. तालुकानिहाय निकालात शहापूर तालुक्याने २५६ विद्यार्थी पात्र ठरवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर मुरबाड तालुक्यात ६७, भिवंडीमध्ये ३४, कल्याणमध्ये १६ आणि अंबरनाथमध्ये ११ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८० शाळांमधून ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६१५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. या परीक्षेत ११ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली आहे. इयत्ता आठवीत शहापूर तालुक्यातील ८ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. मुरबाड तालुक्यात २ तर अंबरनाथ तालुक्यात १ विद्यार्थी पात्र ठरला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्ग तसेच सराव चाचण्यांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. विशेषतः शहापूर तालुक्याने केलेली उत्कृष्ट कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धात्मक तयारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवावे यासाठी ‘शहापूर पद्धत’ जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, मार्गदर्शन आणि शैक्षणिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

