वृत्तसंस्था : मराठी भाषेचा जागतिक स्तरावर अधिक व्यापक प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, इंग्लंडमधील लंडन येथे ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या केंद्रासाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपये खर्चून लंडनमधील ‘महाराष्ट्र मंडळा’ची ऐतिहासिक इमारत खरेदी केली असून, पुढील दोन महिन्यांत हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी ३९ मंच सध्या कार्यरत आहेत. मुंबईतील मराठी भाषा भवनाचे बांधकाम वेगाने सुरू असून ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच ऐरोली येथे ३४ कोटी रुपयांच्या खर्चातून मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विधान परिषदेत नियम ९२ अंतर्गत झालेल्या अर्धा तासाच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या चर्चेत उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला होता.
मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर व्यापक उपक्रम राबविणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा न करता विश्व मराठी संमेलनासह वारकरी, बाल, युवा, महिला आणि कामगार साहित्य संमेलनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचे साहित्य विविध भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच भाषाविषयक कामांना अधिक गती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘जिल्हा भाषा अधिकारी’ हे पद निर्माण करण्यात येणार असून, पुढील एका महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे ‘मराठी भाषा विकास केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा जागतिक स्तरावर सन्मान वाढविणे, साहित्य संवर्धनाला चालना देणे आणि नव्या पिढीमध्ये मराठीबद्दल अभिमान निर्माण करणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

