ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाच, गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या ३०७ मंडळांपैकी १४९ मंडळांना पालिका प्रशासनाने परवानगी देऊ केली आहे. उर्वरित १५८ मंडळांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून या मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. अनेक मंडळांकडून गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात येतात. या मंडपांसाठी पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनक तत्वानुसार नियमावली केली आहे. या नियमावलीनुसार मंडळांना पालिका प्रशासनाकडे मंडप उभारणीसाठी अर्ज करावे लागतात आणि त्याची पाहाणी करून पालिका प्रशासन मंडप उभारणीस मंजुरी देते. यामध्ये वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत दाखले मंडळांना घ्यावे लागतात. या दाखल्यानंतरच मंडप उभारणीची अंतिम परवानगी पालिकेकडून दिली जाते. परंतु या प्रक्रियेमुळे परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने मंडळांना मंडप उभारणीस कमी कालावधी मिळायचा. त्यामुळे ही प्रक्रीया अधिक सुलभ करण्यासाठी पालिकेने मंडळांच्या मागणीनुसार एक खिडकी योजना राबविण्यास सुरूवात केली. तसेच पालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. यंदाही अशीच सुविधा पालिकेने मंडळांना उपलब्ध करून देण्यात आली असली तरी त्यात विलंब होताना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळांकडून परवानगीसाठी आलेले अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडील आवश्यक परवानगी, ना हरकत दाखला घेवून प्रभाग समिती स्तरावर तत्काळ मार्गी लावावेत. किती परवानगी देण्यात आली, त्यात काही विलंब होत नाही ना याचा सहायक आयुक्त आणि परिमंडळ आयुक्त यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले होते. यानंतरही अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाही १५८ मंडळे परवानगीच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त जी. जे. गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाणे महापालिकेकडे गणेशोत्व मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने १२२ अर्ज दाखल केले असून त्यापैकी ८४ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. तर, ऑफलाइन पद्धतीने १८५ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ६५ अर्जांना मंजुरी मिळालेली आहे. उर्वरित १५८ मंडळांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून या मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.