डोंबिवली : जीवाची पर्वा न करता भारत देशाच्या सीमेवर अति दुर्गम भागात आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषद आणि शहीद कॅप्टन विनयकुमार सचान, डोंबिवली शाखांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
सीमावर्ती भागातील जवानांसाठी दिवाळी फराळ दिवाळीच्या दिवशी मिळावा या विचारातून आतापासून दिवाळी फराळाचे डबे भरून ते बंदिस्त करण्याच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. दिवाळी फराळा बरोबर शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी तयार केलेली दिवाळी शुभेच्छा भेट कार्ड सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषदेतर्फे सीमावर्ती भागात लष्करी जवानांना दिवाळी फराळ पाठविण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या वर्षी देशाच्या नऊ सीमांवरील पाच हजार जवानांना दिवाळी सणाच्या काळात दिवाळी फराळ वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी दहा हजार दिवाळी फराळाचे डबे सीमेवरील जवानांना पोहचविण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे ५० लाख रूपये खर्च प्रस्तावित आहे. देशप्रेमी नागरिक, लोकसहभागातून ही उभी रक्कम उभी केली जात आहे, असे संयोजकांनी सांगितले.