ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले. या सोहळयाप्रसंगी क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुल, ठाणे चे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा सदस्य आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसिलदार युवराज बांगर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आज आनंदाचा दिवस आहे. खेळाडू आणि एक तंदुरूस्त पिढी घडविणाऱ्या या संकुलाचं आज उद्घाटन होत आहे. ठाण्याचा पालकमंत्री असल्यापासून मी या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्याचं उद्घाटनाचं करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. मला खात्री आहे या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तालुक्यात, जिल्ह्यात नवनवीन खेळाडूंना आपलं कसब दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यातून चांगले खेळाडू आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधीत्व करतील. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणाले, ठाण्याला खेळ आणि खेळाडू यांच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात आजवर झालेले आहेत. ठाणे तालुका क्रीडा संकुल हे त्या या क्रीडा क्षेत्रातले पुढले पाऊल आहे. काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडविण्याचे काम इथे होणार आहे. राज्यात खेळ आणि खेळाडूंना पोषक असं वातावरण आहे, असे सांगून ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. देशभरातील सर्वच राज्यातील युवा आणि खेळाडू त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रीय स्तरावरचा हा युवा मेळावा आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली होती आणि ती आपण यशस्वी करून दाखवली.